एक हजारांत तीन ते चार बालकांना जन्मजात बहिरेपण असण्याची शक्यता असते. तसं पाहिलं तर हे प्रमाण दुर्लक्षण्यासारखे नक्कीच नाही. विशेषतः बाळाचे माता पिता एकमेकांच्या रक्ताच्या नात्यातील असतील वा नातेवाईकांत कोणास जन्मजात बहिरेपण असल्यास ही शक्यता जास्तच वाढते. तसेच गुंतागुंतीची प्रसूती, जन्मोत्तर तीव्र कावीळ अथवा जन्मजात इतर कुठलेही व्यंग असलेल्या बालकांना जन्मजात श्रवणदोष नसल्याची खात्री करून घ्यायला हवी. कारण जन्मजात बहिरेपण सहज लक्षात येणारा प्रकार नाही. बाह्यकर्ण तर बऱ्याचदा दिसायला नैसर्गिक असतो. जो काय दोष असतो तो अंतर्कर्णात. शिवाय काही दुखत नसते आणि वर ऐकू न येणारे मूल बोलूही शकत नसतेच. मग हे बहिरेपण ओळखायचे कसे?
इथे पालकांचे तारतम्य महत्त्वाचे. तीन महिन्यांपर्यंतच्या नवजाताने आईच्या आवाजाने शांत व्हायला हवे. निदान मोठ्या आवाजाने दचकायला हवे. सहाव्या महिन्यापर्यंत खेळण्याच्या आवाजाच्या दिशेने मान वळवायला हवी. नऊ महिन्यापर्यंत तोंडाने आवाज काढायला सुरुवात होते. टीव्ही, पंखा आई अशा नित्य परिचयाच्या गोष्टी दर्शवायला हव्यात. बहिरेपण असलेले एक वर्षाचे बालक एकही शब्द स्वतः बोलत नाही. हात, डोके ,डोळे दाखव असे सांगितल्यावर त्याला नीटसं उमगत नाही. तर दीड वर्षापर्यंतच्या बालकाची शब्दसंपत्ती वाढायला हवी. त्या ऐवजी आ, मा, बा अशी मर्यादित रहाते. दोन वर्षांपर्यतच्या मुलाने वाक्ये बोलायला हवीत. या लक्षणांबाबत पालक जागरुक असतील किंवा योग्य त्या तपासण्या कर्तव्यबुद्धीने करण्याची मानसिकता असेल तरच वेळेत निदान व उपचार केले जातात. अन्यथा बोलेल थोड्या दिवसांत अशा आशेवर महत्त्वाचे दिवस वाया घालवले जातात.
तोच प्रकार बालवयातील श्रवणदोषाचा. जन्मतः ऐकू शकणाऱ्या बालकाला नंतर बहिरेपण आले तर ते ओळखावे लागते . टॉन्सिल्स व अॅडीनॉईड्सच्या प्रादुर्भावाने मध्यकर्णात चिकटपणा येऊन ऐकू न येणे अत्यंत कॉमन आहे. यासाठी औषधोपचार व आवश्यकता असल्यास कानात व्हेन्टिलेशन ट्यूब बसवण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. अमेरिकेत होणाऱ्या एकूण शस्त्रक्रियांपैकी सगळ्यात जास्त ही शस्त्रक्रिया केली जाते. पण आपल्याकडे कानाच्या आत तपासणी करण्याचे ज्ञान नसतानाही बऱ्याच पॅथ्यांचे तज्ज्ञ सल्ला देणारे भेटतात. ‘ऑपरेशन नको, असा सोईस्कर सल्ला देणारा डॉक्टर चांगला, ऑपरेशन सुचवणारा पैशामागे लागलेला,’ अशा कॉमेंट्स होतात. मग हा मध्यम प्रकारचा श्रवणदोष दुर्लक्षित राहतो. अशा मुलाला हळू बोललेले ऐकू येत नाही. आपल्या नेहमीच्या बोलण्याची तीव्रता ६० डेसीबेल्स असते. ते त्याला जेमतेम समजते. मोठा आवाज मात्र नीट ऐकू येतो. आई सांगते, ‘फटाके वाजले की याचं अभ्यासातलं लक्ष लगेच उडतं. मी मात्र कितीही बडबडले तरी माझ्याकडे दुर्लक्षच करतो.’ साहजिकच शैक्षणिक प्रगती खुंटते .
जन्मजात व बालवयातील श्रवणदोष